Thursday, July 28, 2011

श्रीकेदारेश्वर मंदिरासमोर जी पुष्करणी आहे तिला एके काळी ‘केदारबाव’ म्हणत. ती चांगल्या घडीव दगडांची बांधलेली आहे.पाण्यापर्यंत जाण्यासाठी हिला सुबक तेरा पायर्‍या आहेत.याशिवाय उत्तरेकडून महाद्वारापासूनही पायर्‍या आहेत.

केदारबाव आयताकृती कुंडाच्या आकाराची आहे.या केदारबावेसंबंधी एक आख्यायिका आहे. मंदिरातील शंकराचे सोमसूत्र व लिंग वेगवेगळी होती.कोणीही ती वेगवेगळी करू नयेत या सदभावनेने निगडे घराण्यातील एका पुरुषाने त्यामध्ये पातळ शिशाचा रस ओतून ती एकजीव केली.पण त्याच रात्री श्रीकेदारेश्वराने त्या सदगृहस्थाच्या स्वप्नात येवून सांगितले की, “ तू मला पोळले आहेस, तेव्हा तू बांधलेल्या केदारबावीचे पाणी कोणी पिणार नाही.” खरोखरच केदारबावीचे पाणी हिरवेगार पडले. तेव्हापासून त्या विहिरीचे पाणी कोणीही वापरत नाही।

श्रीकेदारेश्वराचे देवळात आणि त्यासमोरील याच पुष्करणीवर बसून गोताचे निवाडे झालेले आहेत.दादोजी कोंडदेव या पुष्करणीवर बसून निवाडे करत असत. त्यामुळे या वास्तूला ऐतिहासिक महत्त्व आहे.